Monday, December 24, 2007

- o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o -

चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच। पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे। तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी काकेशस' असे म्हणत। हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्य शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली। पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी एका राजाने साधले। तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त "तर आपण चंद्रगुप्ताच्या जन्मापासून सुरुवात करुया...


चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो. तेव्हाच तर त्या तयार होतात. यावर माझा विश्वास असल्याने, मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार. पण हा एक संभाव्य तर्क आहे यात काही शंका नाही. तर सम्राट चंद्रगुप्ताचा जन्म नंद कुळातच झाला असावा असा माझा तर्क आहे... अरे असे अवाक् का झालात? काय म्हणता? ज्या कुळात तो जन्मला त्याच कुळाचा नाश त्याने स्वतःच्या हातांनी कसा केला? तीच तर खरी गंमत (खरे तर शोकांतिका) आहे. आश्चर्याच्या गोष्टी विसरुन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात.
मगधनरेश धनानंद राजाला चैनी-विलासी जीवनाची आवड होती। धनानंदाच्या सेवेत 'मुरा' नावाची एक दासी होती. मुरा दिसायला सुंदर होती. विलासी धनानंदाच्या दृष्टीस मुरेचे लावण्य पडताच त्याने तिला स्वतःची खास दासी म्हणून नियुक्त केले. मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतःपुरातील दासी बनवले. दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती. निदान धनानंदासारखा विषयासक्त मगधसम्राट असल्यावर तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती.


काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले। धनानंदाने तिची योग्य ती काळजीदेखील घेतली होती. ती प्रसूत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ति होईल असे राज-ज्योतिषिंनी राजाला भविष्य सांगितले. ते ऐकून राजाला भय पडले. दासीपुत्र चक्रवर्ति होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवायचा निर्णय घेतला. कसा कोणास ठाऊक पण मुरेला धनानंदाचा बेत कळला. अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले. मगधाबाहेर गेल्यावर मुरेला एका गुराख्याने आसरा दिला.

एवढ्या अवधीत तक्षशीलेचे जगद्विख्यात आचार्य चाणक्य मगधाची राजधानी 'पाटलिपुत्र' मधे आले। धनानंदाचा मुद्राराक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता। तो अतिशय एकनिष्ठ होता। फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता। त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रितीने हाकला जात होता। त्याच्यावर राज्यकारभार सोपवून धनानंद विलासात दंग झाला. आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करुन द्यायला आले होते. पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आर्य चाणक्यांची निंदा करुन दरबारातून बाहेर काढले. या अपमानाने क्रोधित होऊन आर्य चाणक्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की, "जोपर्यंत मगधाच्या गादीवर असलेल्या नंद कुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही.... " झालं... आर्य चाणक्यांची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची टर उडवायला सुरुवात केली. मग काय आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. आधीच भडकलेला आचार्यांचा क्रोधाग्नि आणखीनच भडकला. आचार्य तेथे क्षणभरही न थांबता निघाले. दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशीलेकडे प्रयाण केले.

कर्मधर्मसंयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा, चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली. चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ-दहा वर्षांचा असेल. चाणक्य तक्षशीलेकडे निघाला असताना एके ठिकाणी गुराख्याची काही मुले त्याला दिसली. एक मुलगा ऐटीत एका उंच दगडावर बसला होता. त्यच्या मधुर वाणीने ती गुराखी मुलेच काय पण आचार्यदेखील मोहित झाले. दोन मुलांच्या आपापसातील भांडणाचा न्याय-निवाडा तो गुराखी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता. चाणक्यांनी लगेच बालचंद्रगुप्ताच्या - होय तो मुलगा चंद्रगुप्तच होता - आईची भेट घेतली. एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धी असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागितले.. आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली. मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहुन अधिक सक्षम हातांनी घडविले जाणार होते म्हणून आणि मुरेलाही धनानंदाचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्यांच्या हवाली केले.
चाणक्याने मुरेचा निरोप घेतला. मुरेनेही धनानंदाने केलेला अत्याचार बालचंद्रगुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध (सूड म्हणू हवं तर) घ्यायची भावना भडकवली . सूडाच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय गाठण्याच्या हेगेला.आर्य चाणक्यांबरोबर तक्षशिलेला गेला.तक्षशिलेला पोहोचताच आर्य चाणक्यांनी मुळीच वेळ वाया न घालवला नाही. चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यांनी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे आचार्यपद स्वीकारले. आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करुन राजनीती, शस्त्रविद्या, युद्धाचे डावपेच, यांमध्ये निष्णात केले. बाकीच्या विषयांमधेसुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवत होता. जसजसा चंद्रगुप्त आर्य चाणक्यांच्या हाताखाली शिकत होता तसतसा तो आपली बुद्धीमत्ता प्रकट करत होता. मनोमन चाणक्य सुखावले होते. कारण चंद्रगुप्त त्यांच्या अपेक्षेहून अधिक हुशार, चाणाक्ष आणि समंजस होता.
तक्षशिलेत चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे. पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावे. शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबेज झाला होता. आता त्याला ध्यास होता तो धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचारांचा सूड घ्यायचा. त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती. आणि त्यानुसार सर्व सिद्धताही केली होती. पण मगधस्वारीत एकच गोष्ट आड येत होती. ती म्हणजे सिकंदराची स्वारी.
अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्त्वाकांक्षी तरुण योद्धा होता. त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करुन घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसमवेत सिकंदराच्या गोटात पाठवले. सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती पत्करली होती. अनेक मांडलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते. त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवळे सोपे गेले. चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते. पण या गोष्टीला पुरावा नाही. तरी या दोघांची भेट ही अशक्यदेखील नव्हती. चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त, त्यांची युद्धपद्धति, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा बारकाईने अभ्यास करुन ते ज्ञान आत्मसात केले. या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला.
सिकंदराच्या सैन्याने पुढे जाणे आता नाकारले होते। सतत सात वर्षे मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यात भर म्हणून यौधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांना मिळाली होती. अगोदरच थकलेल्या सैन्याची ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली. सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करुन सिकंदराला ठार मारण्याचा कटदेखील काही लोकांनी केला होता. यौधेय हे अतिशय बलशाली, वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते. प्रसंगी स्त्रियादेखील युद्धभूमिवर शस्त्रे घेऊन युद्ध करीत. या यौधेय गणराज्याला घाबरुन सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला. परिणामी सिकंदराला आपली जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला.


सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. सैन्य जमताच आचार्यांनी चंद्रगुप्ताच्या साहाय्याने सैन्याला आधुनिक युद्धकलेचे शिक्षण दिले. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु-शिष्यांनी पाटलिपुत्राकडे प्रयाण केले. शक्य तेवढ्या लवकर पाटलिपुत्र गाठायचा चाणक्याचा विचार होता. चंद्रगुप्तदेखील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आतुर झाला होता. चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला. पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहजपणे पोहोचले. त्यांना प्रतिकार झालाच नाही. होणार तरी कसा? चाणक्याने आपल्या भेदनीतीचा वापर करुन गुप्तहेरांच्या सहाय्याने मगधसेनापतीस केव्हाच आपल्याकडे वळवून घेतले होते. चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले. थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्तिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार? शेवटी चंद्रगुप्ताने पाटलिपुत्रात प्रवेश मिळविला. ही देखील आचार्यांच्या भेदनीतीचीच कृपा होती. अन्यथा चाणाक्ष अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळणे महाकठीण होते...
पाटलिपुत्रात प्रवेश करताच चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु-शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली। धनानंदाचा चतुर, मुत्सद्दी अमात्य मुद्राराक्षस हा गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. पण विलासात दंग असलेला धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरुन ठेवले होते. धनानंद खाली मान घालून उभा होता. आचार्यांनी धनानंदाला आपल्या भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करुन दिली. घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती. मग आचार्यांच्या भेदक नजरेला नजर देणं तर दूरच. आचार्यांनी चंद्रगुप्तास खूण केली. आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता. आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. धनानंदाला स्वत:चा अंत समोर दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्यांकडे गयावया करु लागला. पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि....... एकाच घावात चंद्रगुप्तानं धनानंदाचं मस्तक धडावेगळं केलं ...


अशा रितीने चाणक्यानं आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताला हाताशी धरुन तडीस नेली। पण इथंच आपली कथा संपत नाही. चंद्रगुप्त आता मगधसम्राट झाला होता. युक्त्या-प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महा-अमात्य होण्यास भाग पाडले. चाणक्य आता निश्चिंत झाला होता. चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी 'कौटीलिय अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चाणक्य हा आयुष्यभर चंद्रगुप्तासोबत होता की मगध साम्राज्याची योग्य घडी बसवून अन्यत्र निघून गेला हे कळण्यास मार्ग नाही. पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले, ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशीलेकडे प्रयाण केले असावे असे वाटते.

साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने - सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली। पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले. अशा तर्‍हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्‍या सरदारांपैकी एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. व झालेल्या तहामुळे सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व त्याच्याशी सख्यत्व केले.

अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची आर्य चाणक्यांची कल्पना वास्तवात आणली. सेल्युकसशी सख्यत्व केल्यावर सेल्युकसने मॅगॅस्थिनिस हा आपला वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला. सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता. फावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती लिहिली. त्याच्या वर्णनांमुळेच आपल्याला त्या काळाची योग्य माहीती मिळण्यास मदत होते.
चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रितीने विस्तार केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर आला. चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्यविस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळ्या लेखांचा विषय आहे. शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन धर्माचा स्वीकार केला.अशी होती 'भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा .... (संपूर्ण)


(चंद्रगुप्त आणि चाणक्य या जोडगोळीचा भक्त) सागर भंडारे

Tuesday, November 20, 2007

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

पुस्तक परीक्षण
मित्रांनो,
मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे.मी काही हिटलरची भलावण नाही करत.पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुस-या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते.
दुस-या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पराभव न पत्करता जर्मनी पहिले महायुद्ध हरले होते.हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर थोडेसेच लढले गेले होते.कैसर राजाच्या पलायनाने जर्मनीला पराभव पत्करावा लागला.जर्मन जनतेच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण युद्ध जिंकत असताना कसे हारलो.
जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले.जर्मनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली.
हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा त्याच्यापुढे किती प्रश्न होते ते पहा

- ६० लाख लोकांची बेकारी
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत अगदी हास्यास्पद झाली होती(जर्मनीचे चलन एवढे पडले होते की एक भाजीची जुडी घेण्यासाठी पोतेभर पैसे घेउन जावे)१ डॉलर= ७,००,००० जर्मन मार्क्स
अवघ्या तीन वर्षात त्याने या प्रश्नांचा निकालदेखील लावला आणि जर्मनीला स्वयंपूर्ण देखील केले

- पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्त राष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती
- जर्मनीला एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य उभारायची परवानगी नव्हती
असे शेकडो प्रश्न त्याच्यापुढे उभे होते
हे सर्व प्रश्न त्याने ज्या पद्धतीने सोडवले, ते पाहता माणूस आश्चर्यचकीतच होतो कधी नमते, तर कधी धमकी तर कधी शांततेची तान.या सर्वांच्या जोरावर हिटलरने जगातील महाशक्ती समजल्या जाणा-या बड्या नेत्यांना असे झुलवले की त्याच्या मुत्सद्देगिरीची दाद त्याचे शत्रूदेखील देतात. जगाच्या रंगमंचावरचा हा अक्षरश: एकपात्री प्रयोग होता.


हिटलर १९३३ साली सत्तेवर आला तेव्हा त्याला बहुमत नव्हतेच। तरी तो सत्तेवर आला.सत्तेवर येताच त्याने तीन वर्षात जर्मनीला एवढे बलशाली केले की जर्मनीत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.फक्त ३८% मते असताना तीन वर्षानंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९।९९ % बहुमत होते, यावरुन हे लक्षात यावे
- बेरोजगारी नावालाही शिल्लक उरली नाही
- जर्मनीचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावले
- व्हर्सायच्या तहाच्या चिंध्या केल्या व जाहीरपणे सांगितले की जर्मनी ही नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही
- जर्मनीच्या सैन्याची आरमार विभागासकट पुनर्रचना केली
- युवकांना बलशाली करण्यावर कठोर मेहनत घेतली
(जेव्हा १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा शत्रूसैन्यापुढे जर्मन सैनिक एवढे बलशाली आणि ताकदवान दिसायचे की दोस्त राष्ट्राचे सैन्य जर्मनीला प्रतिकार करण्याच्या योग्यतेचे नव्हते आणि हिटलरला सहज चिरडू या भ्रमात राहण्यापेक्षा दोस्त राष्ट्रांनी सैन्य बांधणीस प्राधान्य द्यावयास होते असे हे बरेच इतिहासकार मान्य करतात)


हिटलरने रक्ताचा एक थेंबही न सांडता ३ भूभाग जर्मनीला जोडले.हे त्याच्या राजकीय ज्ञानाचे आणि आपल्या शत्रूंचे पाणी जोखण्याचे उत्तम उदाहरण आहे.दुसरे म्हणजे हिटलरची विलक्षण मानसिक शक्ती.त्याचे आडाखे इतके अचूक असत की त्याच्या पुढे त्याच्या सेनानींचा विरोध पूर्णपणे थंडावला.युरोपात जबरदस्त चढाई करुन १०-१५ दिवसांत एकेक देश जिंकून हिटलरने आपल्या शत्रूला जबरदस्त धडकी भरवली होती.हिटलरने रशियावर केलेली हिवाळ्यातील स्वारी त्याला खूप घातक ठरली.इतिहासकार हे खुल्या दिलाने मान्य करतात की हिटलरने रशियावर स्वारी केली नसती तर आज आपल्याला दुस-या महायुद्धाचा इतिहास वेगळाच दिसला असता.
तर मित्रांनो, दुस-या महायुद्धाचा हा अत्भुत इतिहास तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा

तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल.

धन्यवाद
सागर

Wednesday, June 6, 2007

संस्कृती : आपल्या देशाची नि धर्माची माहिती

संस्कृती : आपल्या देशाची नि धर्माची माहिती


वर्षातील साडेतीन मुहूर्त आणि चातुर्मासाचा काल

वर्षातील साडेतीन मुहूर्त:
१. वर्षप्रतिपदा
२. अक्षय तृतीया
३. विजयादशमी हे तीन मुहूर्त आणि
४. बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त

चातुर्मास : आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचे ४ महिने


पंचामृत, पंचधातू, पंचमहाभूते आणि अभ्यासाची ५ अंगे

पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात.
१. गाईचे दूध
२. दही
३. तूप
४. मध
५. साखर

पंचधातू: ५ धातूंचे मिश्रण
१. सोने
२. रुपे
३. लोखंड
४. तांबे
५. जस्त

पंचमहाभूते: यापासून सजीव सृष्टी तयार झाली
१. पृथ्वी (जमीन)
२. आप (पाणी अथवा जल)
३. तेज (अग्नी)
४. वायु
५. आकाश



अभ्यासाची ५ अंगे:
१. अभ्यास
२. लेखन
३. निरिक्षण
४. चर्चा
५. गुरुची उपासना


षड् रिपु : माणसाचे सहा शत्रू

षड् रिपु : माणसाचे सहा शत्रू
१. काम : वैषयिक गोष्टीत गुंतणे
२. क्रोध : राग
३. लोभ : संपत्तीची हाव
४. मोह : जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याचा हव्यास
५. मद : स्वत:विषयीचा फाजील गर्व अथवा अहंकार
६. मत्सर : दुसर्र्याकडे असलेल्या गोष्टीचा हेवा करणे

सप्त चिरंजिव

१. अश्वत्थामा
२. बलि
३. व्यास
४. हनुमंत
५. विभिषण
६. कृप
७. परशुराम


अष्टगंध आणि नवरत्ने

अष्टगंध :
१. चंदन
२. अगरु
३. देवदार
४. कोष्ट - कोळींजन
५. कुसुम
६. शैलज
७. जटामांसि
८. सुरगोरोचन ही आठ सुगंधी द्रव्ये वापरुन तयार केलेले गंध

नवरत्ने :
१. हिरा
२. मोती
३. प्रवाळ
४. गोमेद
५. इंद्रनील
६. वैडूर्य
७. पुष्कराज
८. पाचू
९. माणिक


वेद पद्धतीतील १२ मास (महिने)

१. मधु
२. माधव (मिळून वसंत ऋतू)
३. शुक्र
४. शुचि (मिळून ग्रीष्म ऋतू)
५. नभ
६. नभस्य (मिळून वर्षा ऋतू)
७. इष
८. उर्ज (मिळून शरद ऋतू)
९. सहस
१०.सहस्य (मिळून हेमंत ऋतू)
११.तपस्
१२.तपस्य (मिळून शिशिर ऋतू)


दहा प्राण

दहा प्राण : आपल्या शरीरात असलेल्या वायुचे हे १० विविध प्रकार आहेत
(०१)प्राण - श्वास. नाकातून आपण आत घेतो तो वायु
(०२)अपान - उच्छवास.नाकातून आपण बाहेर सोडतो तो वायु
(०३)व्यान - आपल्या अवयवांना हालचाल करायला लावणारा वायु
(०४)समान - रक्ताभिसरण करणारा वायु
(०५)उदान - अन्न गिळण्यास मदत करणारा वायु
(०६)नघ - ढेकर आणणारा वायु
(०७)कुरम् - पापण्यांची उघडझाप करणारा वायु
(०८)कृकल - जांभई आणणारा वायु
(०९)देवदत्त - भूक निर्माण करणारा वायु
(१०)धनंजय - मृत्यूनंतर शरीरात राहून मृत शरीर फुगवणारा वायू

सोळा संस्कार

१. गर्भाधान (गर्भसंस्कार)
२. पुंसवन
३. अनुवलोभन
४. विष्णुबली
५. सीमंतोन्नयन
६. जातकर्म
७. नामकरण
८. निष्क्रमण
९. सूर्यावलोकन
१०.अन्नप्राशन
११.चूडाकर्म (जावळ)
१२.उपनयन (मुंज)
१३.गायत्र्युपदेश
१४.समावर्तन
१५.विवाह
१६.अंत्यविधी


अमरकोशातील देवतांचे १० जातिभेद

१. विद्याधर
२. अप्सरस्
३. यक्ष
४. रक्षस्
५. गन्धर्व
६. किन्नर
७. पिशाच
८. गुह्यक
९. सिद्ध ..... आणि
१०. भूत

संस्कृत सुभाषिते

मित्रांनो,
संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे असे म्हणतात. संस्कृतमधे खूप सुंदर सुंदर सुभाषिते उपलब्ध आहेत. त्या सुभाषितांची गोडी सर्वांनाच आपल्या माय मराठीतही चाखावयास मिळावी या उद्देशाने लेखन केले आहे.

क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥

अर्थ : क्षमा हे दुबळ्यांचे बळ आहे तर क्षमा हे बलवानांचे भूषण आहे. (एकदा)क्षमेने जग वश केल्यावर (मग)क्षमेने काय साधत नाही? (क्षमावृत्तीने वागून जर सर्व लोकांना आपलेसे करता येते तर क्षमेने आणखी काय साधावयाचे राहते?)

विद्याधिदेवता साक्षात् धन्या देवी सरस्वती ।

यत्प्रसादेन कुर्वन्ति काव्यानि कवय: खलु: ॥
अर्थ: मूर्तीमंत विद्येची श्रेष्ठ देवता अशी सरस्वती देवी धन्य होय. खरोखर तिच्या (जिच्या)कृपेने कवी काव्ये करतात (करु शकतात)

माता मित्रं पिता चेति स्वभावात् त्रितयं हितम् ।

कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धय: ॥
अर्थ : आई,वडिल व मित्र हे तिघे स्वभावत:च आपले हित इच्छिणारे असतात. तर इतर दुसरे (मात्र) काही कारणामुळे अथवा काही कामामुळे हिताची बुद्धी बाळगणारे (म्हणजे हित इच्छिणारे) असतात.

न हि कश्चित् विजानाति किं कस्य श्वो भविष्यति ।

अत: श्व: करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्
अर्थ: उद्या कोणाचे काय होईल हे खरेच कोणी जाणू शकत नाही. म्हणून बुद्धिमान् (शहाण्या)मनुष्याने उद्या करावयाची कामे आजच करावीत.


तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले ।

दुग्धं यच्छति लोकेभ्यो धेनुर्नो जननी प्रिया । ।
अर्थ : गाय कुरणातील गवत खाते. डबक्यातील पाणी पिते आणि लोकांना दुध देते. अशी ही गाय आमची प्रिय माताच आहे.


दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव ।

तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् । ।
अर्थ : दही गोड असते, मध गोड असतो, द्राक्षे गोड असतात आणि अमृतही गोडच असते. तथापि (ह्या सर्व वस्तू मधुर असल्या तरी) ज्याचे मन जेथे (ज्यावर)जडलेले असते खरोखर तेच त्याला मधुर (प्रिय)असते.

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ ।
समेत्य च व्यपेयातां तद्वत्भूतसमागम: । ।
अर्थ : दोन ओंडके समुद्रात वाहता वाहता काही काळ भेटतात्, एकत्र येतात. आणि नंतर प्रवाहाच्या ओघात परत विभक्त होतात. मानवी जीवनातील भेटीही तशाच आहेत.


समुद्र वसने देवि पर्वतस्तन मण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यम पाद्स्पर्श क्षमस्व मे ।।
हे देवी, समुद्र तुझे आसन आहे, पर्वत तुझे स्तन आहेत. ज्याचे वात्सल्य रस नद्यांच्या रुपाने नेहेमी प्रवाहित होत असतात. हे विष्णुपत्नी, मी तुला प्रणाम करतो माझ्या पायांना तू क्षमा कर.

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते ।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि । ।
अर्थ : हे लक्ष्मणा ! सोन्याची असली तरी (ही)लंका मला आवडत नाही. खरेच जननी (आई) आणि जन्मभूमी (दोन्हीही)स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत.

नारिकेलसमाकारा दृश्यन्तेSपि हि सज्जना: ।
अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहरा: । ।
अर्थ: खरोखर सज्जन नारळासारखे (बाहेरुन कठोर व खडबडीत पण आतुन मधुर) दिसतात. पण इतर (दुर्जन)बोरासारखे केवळ बाहेरुनच रमणीय दिसतात

लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् । ।
अर्थ: मुलाचे पहिली पाच वर्षे लाड करावेत. पुढे दहा वर्षे (जरुर तेव्हा) शिक्षा करावी. परंतु सोळावे वर्ष लागल्यावर मुलाशी मित्राप्रमाणे वागावे.


अश्व नैव , गज नैव, व्याघ्र नैवच नैवच !
अजा पुत्र बलिर्द्ध्यात देवौ दुर्बल घातकं
अर्थ : असा की, घोडा नाही, हत्ती नाही आणि वाघ तर नाहीच नाही , तर बकरीच्याच पिलाचा बळी दिला जातो, देव सुध्दा दुर्बलाचाच घात करतो नीलकांत

यौवनं धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता ।
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् । ।
अर्थ : तारुण्य, धनसमृद्धी, सत्ता व अविचारीपणा यांपैकी एकेक गोष्टसुद्धा अनर्थाला कारणीभूत होते. मग जेथे चारही मिळून आहेत तेथे काय (सांगावे)?

आयुष: क्षण एकोSपि सर्वरत्नैर्न लभ्यते ।
नीयते स वृथा येन प्रमाद: सुमहानहो । ।
अर्थ: आयुष्याचा एकही क्षण सर्व रत्नांनी (सर्व किंवा अनेक रत्ने देऊनसुद्धा)मिळत नाही. असा हा (मोलाचा)क्षण जो वाया घालवितो, त्याची ही केवढी मोठी चूक आहे बरे?


मयुरो विहगो रम्य: आनन्दयति मानवान् ।
पृष्ठे सरस्वती तस्य उपविष्टेति मन्यते । ।
अर्थ: रमणीय पक्षी मोर माणसांना आनंद देतो. त्याच्या पाठीवर सरस्वती देवी बसली आहे असे मानले जाते.


परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् ।
यावन्त: पशवस्तेषां चर्माप्युपकरोति हि । ।
अर्थ: परोपकाररहित (दुसर्र्यावर उपकार न करणार्र्या) मनुष्याचे जीवन व्यर्थ (धिक्)आहे. कारण (जगात)जेवढे म्हणून पशू आहेत त्यांचे कातडेसुद्धा (दुसर्र्यावर) उपकार करते (उपयोगी येते)


बहुभिर्न विरोध्दव्यम् दुर्जनै: सज्जनैरपि ।
स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिका: । ।
अर्थ: दुर्जनांनी आणि सज्जनांनी देखील अनेकांशी (संघटित असलेल्या जमावाशी) विरोध करु नये. पाहा फुत्कार करणार्र्या (भयंकर) नागराजाला देखील (असंख्य)मुंग्या (चावून , मारुन) खाऊन टाकतात.


पक्षिणां बलमाकाशे मत्स्यानामुदकं बलम्
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् । ।
अर्थ : पक्ष्यांचे बळ आकाशात, माशांचे बळ पाण्यात, दुर्बल मनुष्याचे बळ राजा आणि लहान मुलांचे बळ म्हणजे रडणे


यस्मिन् देशे न संमानो न प्रीतिर्न च बान्धवा:
न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत्
अर्थ : ज्या देशात चांगला मान नाही, (कोणाचे)प्रेम नाही,(कोणी) बांधव नाहीत आणि कोणताही विद्येचा लाभ नाही तेथे एक दिवससुद्धा राहू नये

अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते
अर्थ : खूप खोल पाण्यात संचार करणारा रोहित मासा कधी गर्व करीत नाही.परंतु केवळ अंगठ्याइतक्या पाण्यात लहानशी शफरी मासळी मात्र सारखी फुरफुरत असते.

छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे
फलान्यपि परार्थाय वृक्षा: सत्पुरुषा इव
अर्थ : वृक्ष स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसर्‍याला सावली देतात. त्यांची फळेसुद्धा दुसर्‍यांसाठीच असतात. असे हे वृक्ष खरोखर सत्पुरुषांसारखे असतात.


दुर्जनः प्रियवादीति नैतद्-विश्वासकारणम्

मधु तिष्ठति जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम्
अर्थ : दुष्ट मनुष्य गोड बोलणारा आहे, हे एवढे काही त्याच्यावर विश्वास ठेवण्यास पुरेसे कारण नाही.कारण त्याच्या जीभेच्या टोकावर मध असतो (बोलणे मधासारखे गोड असते) परंतु हृदयांत मात्र जहाल विष असते. (अंतःकरणात भयंकर कपट असते)

Thursday, May 31, 2007

महान इजिप्शियन संस्कृती - सागर

महान इजिप्शियन संस्कृती

सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते। ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.


ह्या महान इजिप्शियन संस्कृतीचे तीन मुख्य काळ होते,’सुरुवातीचा काळ’, 'मध्य काळ' आणि 'अस्तकाळ'। सुरुवातीच्या काळात इजिप्शियन संस्कृती प्रगतीसाठी प्रयत्नशील होती। त्यानंतरचा मध्यकाळ हा इजिप्शियन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ मानला जातो. याच मध्यकाळात इजिप्शियनांनी प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते. त्यांच्या हातून अनेक अविस्मरणीय कलाकृतींची निर्मिती झाली. इजिप्शियन संस्कृतीने प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते तो काळ सुमारे ४०० वर्षांचा मानला जातो. अशी ही महान इजिप्शियन संस्कृती सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी उदयास आली.


इजिप्तचे 'अपर इजिप्त' म्हणजे 'दक्षिण इजिप्त' आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' असे दोन भाग पडतात। इजिप्शियन संस्कृती मुख्यत: ह्या 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' मध्ये भरभराटीस आली. पुढील नकाशा ही गोष्ट स्पष्ट करेन.
http://www.civilization.ca/CIVIL/EGYPT/images/geogmape.गिफ

इजिप्तच्या सुवर्णमध्याच्या काळात तुतनखामुन (तुत-आँख-अमुन)(Tutankhamun) ' हा राजा इजिप्तच्या राजगादीवर आला. हा 'तुतनखामुन' राजा इजिप्तमध्ये अतिशय लोकप्रिय होता.'तुतनखामुन' हा 'फॅरोह' (pharaoh) वंशाचा राजा होता.ह्या 'तुतनखामुन'च्या कबरीचा पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. ते म्हणतात की, जगात जेवढे म्हणून पिरॅमिडस् असतील त्यात 'तुतनखामुन' चा पिरॅमिड सर्वोत्कृष्ट ठरेल. या 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडचा शोध १९२२ मध्ये 'सर हॉवर्ड कार्टर' या इतिहास संशोधकाने लावला. 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडमध्ये प्रवेश केल्यावर त्याच्या कबरीमध्ये त्याची 'ममी' पहायला मिळते.'तुतनखामुन' च्या ममीच्या चेहर्‍यावर जो मुखवटा आहे, तो पूर्णपणे शुद्ध सोन्याचा आहे. या मुखवट्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मुखवट्यावर नाग आणि गरुड ही दक्षिण इजिप्शियनांची चिन्हे आढळतात.[तुतनखामुनच्या नावात येणारी (तुत-आँख-अमुन) अमुन ही इजिप्शियन देवता होती. तिची आणि इतर इजिप्शियन देवतांची माहिती येथे पहावयास मिळेल - http://www.ancientegypt.co.uk/gods/explore/main.html -


ही महान इजिप्शियन संस्कृती इजिप्तमधील पिरॅमिडस् साठी प्रसिद्ध आहे. कारण हे पिरॅमिडस् म्हणजे जगातील एक आश्चर्यच आहे. ह्या पिरॅमिडसची बांधणी विशिष्ट प्रकारची आहे. पिरॅमिडला चार बाजू असतात. सर्व बाजू ज्या टोकापाशी मिळतात, त्या ठिकाणी ९० अंशांचा कोन होतो. आज आपण असा पिरॅमिड बांधायला गेलो तर आपण असा पिरॅमिड बांधू शकत नाही. कारण पिरॅमिड बांधायचे इजिप्शियनांचे एक विशिष्ट तंत्र होते. ते तंत्र आपल्याला अजून तरी अवगत नाही. पिरॅमिडस् बांधण्यासाठी इजिप्शियनांनी मोठ-मोठे अवजड दगड वापरले आहेत. इतके अवजड दगड इजिप्शियनांनी वाहून कसे नेले हे एक न सुटलेले कोडे आहे. हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.
एकदा दक्षिण इजिप्तच्या राजाने स्वत:च्या कबरीसाठी खास इमारत बांधायचे ठरवले। त्याप्रमाणे त्याने त्याच्या वजिराला ते काम सांगितले। त्या राजाचा "इमहॉटेप" नावाचा हुशार वजिर होता। त्याने आधी पिरॅमिडची आखणी केली। मग पक्के दगड वापरुन जगातील पहिला पिरॅमिड बांधला. हा पहिला पिरॅमिड उभारायला बराच वेळ लागला. हा पिरॅमिड बांधण्यासाठी 'इमहॉटेप' वजिराने खूप मजूर कामास लावले होते। ह्या पिरॅमिडनंतर असे अनेक पिरॅमिडस् बांधले गेले. हे पिरॅमिडस् बांधणे खूप अवघड होते. पण कारागिरांना एकदा हे तंत्र कळाल्यावर हे पिरॅमिडस् वेगात बांधले गेले. पण हे पिरॅमिडस् बांधणे अतिशय खर्चाचे काम असल्यामुळे ते केवळ राजे व श्रीमंत लोक यांनाच शक्य होते.


इजिप्शियन लोकांच्या अद्भुत पिरॅमिडस् प्रमाणेच इजिप्शियनांच्या 'ममीज्' देखील प्रसिद्ध आहेत। राजे किंवा श्रीमंत लोक स्वत:च्या मृत्यूनंतर स्वत:च्या पिरॅमिडमध्ये स्वत:ची 'ममी' तयार करुन ठेवायचे. शेकडो वर्षे उलटली तरी या 'ममीज्'जशाच्या तशाच आहेत.'ममी' म्हणजे शरीरावर काही विशिष्ट प्रक्रिया करुन ते शरीर सुकवणे. अशा अनेक 'ममीज्' इजिप्तमधल्या अनेक पिरॅमिडमध्ये सापडल्या आहेत. सध्या पिरॅमिडस् ची बरीच पडझड झाली आहे. तरीही आज अनेक पिरॅमिडस् सुस्थितीत आहेत.पाच हजार वर्षांपूर्वीच्या 'ममीज्' जशाच्या तशा आढळतात हे ही एक आश्चर्यच आहे.ह्या 'ममीज्' कशा तयार करायच्या ह्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. पण हे इजिप्शियन 'ममीज्' सहज बनवायचे.अर्थातच स्वत:ची ममी तयार करणे हेही खर्चाचेच काम होते, त्यामुळे हे ही फक्त राजे आणि श्रीमंत लोक यांनाच परवडत असे.


ह्या इजिप्शियनांची एक श्रद्धा होती की, राजा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतो। आपल्या प्रिय राजाला पुढे उपयोगी पडाव्यात म्हणून त्या राजाच्या पिरॅमिडमध्ये इजिप्शियन लोकांनी भाकरीचे तुकडे, घोडे वगैरे प्राणी इ. अनेक वस्तूंच्या 'ममीज्' बनवून राजाच्या कबरीजवळ ठेवल्या आहेत. तसेच मातीची भांडीदेखील राजाच्या कबरीजवळ ठेवलेली आढळतात. एकदा तर इजिप्शियनांनी आपला राजा जिवंत झाल्यावर समुद्रपर्यटनासाठी त्याला उपयोगी पडावी म्हणून नावेचे तुकडे त्याच्या पिरॅमिडमध्ये पुरुन ठेवले होते. पुरातत्त्व संशोधकांनी हे तुकडे जोडल्यावर १३० फूट लांबीची भलीमोठी नाव तयार झाली. ह्या नावेची डोलकाठी २९ फूट उंच होती.


इजिप्शियन लोकांची लेखनाची जी लिपी होती, ती लिपी 'हायरोग्लिफ' या नावाने ओळखली जाते। आपली जशी अक्षरलिपी आहे तशी इजिप्शियनांची 'हायरोग्लिफ' ही चित्रलिपी होती. इजिप्शियनांना अक्षरलिपी ज्ञात नव्हती, पण त्यांना ही चित्रलिपी चांगली अवगत होती.इसवी सन ३१०० वर्षी 'हायरोग्लिफ' लिपी अप्पर आणि लोअर इजिप्त मध्ये प्रचलित झाली.या ठिकाणी या लिपिबद्दल अधिक माहिती पाहू शकाल - http://www.ancientegypt.co.uk/writing/home.html)
हे इजिप्शियन लिहिण्यासाठी कागदासारखी एक वस्तू वापरायचे। 'पेपिरस' नावाच्या झाडाचा पांढरा रंग असलेला पापुद्रा, विशिष्ट प्रक्रिया करुन तो वाळवून, त्यापासून कागदासारखी एक वस्तू तयार करायचे. आपल्या कागदापेक्षा त्यांचा कागद हा वेगळ्या प्रकारचा होता. इजिप्शियनांनी तयार केलेला कागद वजनाने हलका आणि लवचिक असल्याने त्या कागदाच्या घड्याही पडायच्या.


नाइल नदी ही इजिप्तची देणगीच होय. एका विशिष्ट दिवशी नाइलला प्रचंड असा महापूर यायचा. पण वर्षातून फक्त एकदाच. ह्या नाईलला एवढा महापूर यायचा की, कित्येक गावे, कित्येक जमीन पाण्याखाली जायची. ह्या नाइल नदीमुळेच इजिप्शियनांनी पंचांग वा कॅलेंडर बनवले. 'ग्रहण' एकाच ठिकाणी दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते. (आजचे सौरचक्र २२ वर्षांचे मानले जाते. कदाचित त्या काळचा पृथ्वी आणि सूर्यसापेक्ष वेग आणि आजचा वेग यात तफावत असू शकेल)
एवढेच नव्हे तर कोणता तारा, कोणत्या महिन्यात कुठे दिसेल, हेही इजिप्शियन्स सांगू शकत होते। यावरुनच कळून येते की इजिप्शियनांची खगोलशास्त्रातदेखील चांगली गती होती. खरोखर हे इजिप्शियन्स् म्हणजे जगातील आश्चर्याचा नमुनाच होते.


सर्वात शेवटी येतो तो ह्या इजिप्शियन संस्कृतीचा अस्त काळ। ह्या संस्कृतीचा अस्त साधारणपणे इ.स्.पूर्व ४,०००-इ.स्.पूर्व ३,९०० वर्षांपूर्वी झाला. एवढी प्रगत, थोर संस्कृती नष्ट झाली. पण ही संस्कृती कशी नष्ट झाली हे मात्र कोणालाच माहित नाही. आजचे संशोधक, पुराणशास्त्रज्ञ ह्या विषयावर केवळ तर्क लढवित आहेत, पुरावे गोळा करत आहेत.पण अजून तरी त्यांच्या हाती या संस्कृतीच्या अस्ताविषयी काहीच लागलेले नाही.

अशी होती ही इजिप्शियन संस्कृती ... महान इजिप्शियन संस्कृती ...
- सागर

वाचकांचे स्वागत


नमस्कार मित्रांनो,

थोडेसे माझ्याबद्दल:
माझे नाव सागर भंडारे. मूळचा पुण्याचा. पण गेली ३ वर्षे बंगलोर ला सॉफ्ट्वेअर क्षेत्रात काम करीत आहे. तशी लेखनाची आवड लहानपणापासूनच. त्यामुळे मनातले शब्द येथे ब्लॉगच्या माध्यमातून टंकलिखित करत आहे. कथांच्या तुलनेत मी कविता बर्‍याच लिहिल्या आहेत. माझे आधी केलेले व नवीनही सर्वच लेखन येथे देणे आणि त्याद्वारे आपल्या मराठी वाचकांचे मनोरंजन करावे या हेतूनेच सागरस्मृतीचा हा प्रपंच आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.

धन्यवाद,

सागर